Wednesday, October 1, 2008

सानेकरांचा एक शेर

एक वेडी आजमावू पाहते आहे मला
अन् तरीही ऐनवेळी टाळते आहे मला

हा इरादा तर नसावा एक घरट्याचा तिचा ?
एक चिमणी रोज हल्ली भेटते आहे मला

- चंद्रशेखर सानेकर

Sunday, July 6, 2008

मराठी गझलेची बाराखडी

वृत्त, मात्रा इ.

१. लघु गुरू अक्षरांविषयी:एखादे अक्षर हे लघू (र्‍हस्व) आहे की गुरू (दीर्घ) आहे हे त्या अक्षराच्या उच्चारणासाठी लागणार्‍या वेळावर (वजनावर) ठरते.
- अ, इ, उ हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने लघु म्हणजेच र्‍हस्व गणली जातात.
उदा. क, पि, वु इत्यादी
- आ, ई, ऊ, ए, ऐ, औ, अं, अः हे स्वर व हे स्वर असलेली व्यंजने गुरू अर्थात दीर्घ गणली जातात्
उदा. का, णी, दू, जे, पै, डौ, दुः, शं इत्यादी
- जोडाक्षर र्‍हस्व की दीर्घ हे त्याच्या स्वरावरून ठरते.
उदा. स्त, ज्ज, प्रि, ऋ ही जोडाक्षरे र्‍हस्व आहेत.
श्मा, र्‍या, ग्नी, स्थू, त्वे, श्री ही जोडाक्षरे दीर्घ आहेत.
- काही शब्दांमधील जोडाक्षरामुळे त्या जोडाक्षराआधी येणार्‍या र्‍हस्व अक्षरावर जोर किंवा आघात येतो. अशावेळी ते र्‍हस्व अक्षर दीर्घ गणले जाते.उदा. पुस्तक - 'पु' र्‍हस्व असला तरी 'स्त' मुळे त्यावर जोर येतो. म्हणून इथे 'पु' दीर्घ समजावा. सज्जन, सुस्त, कर्म, मित्र, स्वस्त, स्वरबद्ध ही अजून काही उदाहरणे आहेत.

ह्या माहितीच्या आधारे आता शब्दांचा लघु-गुरू क्रम ठेरवता येइल. लघु अक्षरासाठी 'ल' व गुरू अक्षरासाठी 'गा' हा संकेत वापरला जातो.
उदा. समास - ल गा ल
विनासायास - ल गा गा गा ल
अकस्मात - ल गा गा ल ( 'स्मा' मुळे 'क' वर आघात येत आहे. म्हणून 'क' दीर्घ गणला आहे)
प्रिया - ल गा

२. मात्रांविषयी:
र्‍हस्व अक्षराची एक (१) व दीर्घ अक्षराच्या दोन (२) मात्रा मोजतात. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की अक्षर लघु आहे की गुरू हे आधी ठरते. त्यानंतर त्याच्या मात्रा ठरतात. वरचीच उदाहरणे परत घेतल्यास:
समास - ल गा ल - १+२+१ = ४ मात्रा
विनासायास - ल गा गा गा ल = १+२+२+२+१= ८ मात्रा
अकस्मात - ल गा गा ल - १+२+२+१ = ६ मात्रा
प्रिया - ल गा - १+२ = ३ मात्रा
मी - गा - २ मात्रा

३. वृत्ताविषयी:
'पाद' किंवा 'चरण' असलेली रचना म्हणजे पद्य. म्हणजेच कवितेतल्या एका ओळीला चरण म्हणतात. अशा अनेक चरणांचे मिळून काव्य तयार होते. गझलच्या भाषेत चरणाला 'मिसरा' म्हणतात. गझलचे सगळे मिसरे एकाच वृत्तात असायला पाहिजे. वृत्ताचे दोन प्रकार आहेत.
१. अक्षरगण वृत्त - अक्षरगण वृत्तात लिहिलेल्या गझलच्या मिसर्‍यांमधे येणार्‍या अक्षरांचा लघु-गुरू क्रम सारखा असतो. उदा.

ऋतू येत होते ऋतू जात होतेल
गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा - हा ह्या मिसर्‍याचा लगा क्रम झाला. आता ह्यच्या पुढचा मिसरा पाहू

फुलावे कसे हे कुणा ज्ञात होते?
ल गा गा ल गा गा ल गा गा ल गा गा
आता हाच लगा क्रम उरलेल्या सर्व शेरांमधे यायला पाहिजे. क्वचित एका गुरूच्या ऐवजी दोन लघु वापरता येतात. उदा.

तरी ताटवे मग्न झुरण्यात होतेल
गा गा ल गा गा ल लल गा ल गा गा

२. मात्रा वृत - ह्यालाच जाती असेही म्हणतात. ह्यात मिसर्‍यांमधील अक्षरांचा लघु-गुरू क्रम व अक्षरांची संख्या सारखी असेलच असे नाही. पण प्रत्येक मिसर्‍यामधील मात्रांची संख्या सारखी असते. उदा.

पंखांचा अंदाज शेवटी खरा निघाला
गा गा गा गा गा ल गा ल गा ल गा ल गा गा = १४ अक्षरे
२+२+२+२+२+१+२+१+२+१+२+१+२+२ = २४ मात्रा

वाटत होते अंबर जे; पिंजरा निघाला
गा ल ल गा गा गा ल ल गा गा ल गा ल गा गा = १५ अक्षरे
२+१+१+२+२+२+१+१+२+२+१+२+१+२+२ = २४ मात्रा

ह्या गझलच्या उरलेल्या शेरांमधे २४ मात्रा(च) येणे गरजेचे आहे.

४. गझलेचा आकृतीबंध:हा तुम्ही गझलेच्या बाराखडीत वाचला असेलच. तरी 'शेवटी महत्वाचे....' http://www.marathigazal.com/node/14


(सौजन्य - नचिकेत आठवले)